“उदमांजर, भेरली माड आणि माझी भटकंती!” (Palm civet, Fishtail palm and my wanderings!)
(Palm civet, Fishtail Palm and my wanderings!))
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
मी दुर्गभ्रमंतीदरम्यान आढळलेल्या वेगवेगळ्या विशेष गोष्टींबद्दल जेव्हा माझ्या ब्लॉगवर काही माहिती देतो, तेव्हा ती वाचल्यानंतर मला अशा स्वरुपाचे बरेच संदेश (मेसेज) येतात की, “सर, आम्हीही तिथे गेलो होतो; पण तुम्ही ज्या गोष्टीबद्दल तुमच्या लेखात लिहिलंय ती काही आम्हाला तिथे दिसली नाही. तुम्हालाच कशा काय सापडतात अशा गोष्टी?” मेसेज वाचला की काय उत्तर द्यावे ते मला कळत नाही. ‛मी प्रत्येक ठिकाणी सखोल पूर्वाभ्यास करूनच मग फिरायला जातो,’ असे मी सांगतो (ही आत्मप्रौढी नाही!); पण हे काही पूर्ण उत्तर नव्हे! कधीकधी एखाद्या गोष्टीचा खूप पाठपुरावा करावा लागतो (उदा. पन्हाळगडावरील ‛महादेव आप्पाचा डबरा’ शोधण्यासाठी घेतलेला ध्यास...), तर कधीकधी अगदी अनपेक्षितपणे एखादी गोष्ट दिसते (‛दिसणारी’ गोष्ट ‛पाहता येण्या’ची ‛नजर’ प्रयत्नाने विकसित करावी लागते ही गोष्ट वेगळी!)! आज मी ज्याबद्दल लिहिणार आहे ती काही फार दुर्मीळ गोष्ट नाही, मात्र तरीही हा ब्लॉग वाचणाऱ्या शेकड्यातील किमान नव्वद लोकांनी ती कधी ‛पाहिलेली’ नसेल अशी माझी खात्री आहे!
२०१३ सालच्या मार्च महिन्यात माझी नियुक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात झाली. गगनबावडा म्हणजे महाराष्ट्राचे चेरापुंजीच! अतिशय निसर्गरम्य परिसर. भौगोलिकदृष्ट्या हा प्रदेश राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्याला सलगपणे जोडलेला भाग आहे. डोंगर, दऱ्या, घाट, पाणी, निरनिराळे वृक्षवेली यांनी अतिसमृद्ध असा हा भाग म्हणजे विविध पशुपक्ष्यांसाठीचे आगरच जणू! उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील पाणीसाठे आटल्यामुळे आमच्या ग्रामीण रुग्णालयाशेजारी असलेल्या एका तळ्यावर गवे, हरणे, भेकर असे प्राणी पाणी पिण्यासाठी येत असत, ज्यामुळे आम्हाला सतत त्यांचे दर्शन होत असे.
तपकिरी उदमांजर (संग्रहित छायाचित्र) |
मला पहिल्यापासूनच चालण्याची आणि जंगल भटकंतीची सवय आणि आवड आहेच...गगनबावड्यातील मनोवेधक निसर्गामुळे ती द्विगुणित झाली. मी रोज संध्याकाळी ४.३० ते ५.०० च्या दरम्यान जंगल, डोंगर किंवा घाटातील भटकंतीसाठी बाहेर पडत असे. गगनबावड्यातून कोकणात उतरणारे दोन घाट आहेत- एक, डावीकडून जाणारा करूळचा घाट, तर दुसरा उजवीकडून कोकणात उतरणारा भुईबावड्याचा घाट. यांपैकी भुईबावडा घाटात वाहनांची ये-जा खूपच तुरळक असल्यामुळे तो माझा लाडका घाट. (याच घाटात पुढे असणारा पावसाळी धबधबा खूप प्रसिद्ध आहे.) घाटातून खाली उतरल्यावर डावीकडे मागे मान वळवून वरच्या दिशेने पाहिल्यावर गगनगडाच्या आकाश भेदत जाणाऱ्या सुळक्याचे होणारे दर्शन केवळ विलोभनीय आणि चैतन्यमयच असते! असो. तर सांगण्याचा हेतू हा की, या घाटात मी रोज संध्याकाळी फिरायला जात असे -अगदी बेभान होऊन कोसळणाऱ्या पावसातही- न चुकता.
एप्रिलमधल्या अशाच एका रम्य संध्याकाळी (या एकाच वाक्यात मी ललितलेखनाकडे वळलो की काय?!) घाटातून फिरून वर येत असताना सात-सव्वासातच्या आसपास आमच्या समोरून एक झुपकेदार शेपटीचा प्राणी रस्त्याच्या दरीकडच्या बाजूला आडवा पळत जाताना दिसला. मी असा प्राणी पहिल्यांदाच पाहत होतो. माझ्याबरोबर माझे मित्र गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील कक्षसेवक श्री. अनिल लोहार (बाबू) होते. मी त्यांना या प्राण्याविषयी विचारले असता त्यांनी त्याचे स्थानिक नाव ‘पटकुऱ्या’ असल्याचे सांगितले. उदमांजर किंवा सिव्हेटचे मला झालेले हे पहिले दर्शन! एका संध्याकाळी थोडाच वेळ दिसलेल्या त्या पटकुऱ्याने मात्र मला जंगलभ्रमंतीचे -त्यातही रात्रीच्या जंगलभ्रमंतीचे- कायमस्वरुपी वेड लावून टाकले. त्यानंतर मी माझ्याकडे दाखल रुग्ण नसलेल्या अक्षरशः प्रत्येक रात्री ११ ते पहाटे २ या कालावधीत घाटात आणि आजूबाजूच्या जंगलात प्राणी शोधण्यासाठी कोणतीही सुरक्षेची साधने न घेता, केवळ एका विजेरीच्या (टॉर्च) जोरावर जाण्याचे धाडस वर्षभर केले आहे. अशा फिरतीच्या वेळी घाटात कुठे ना कुठेतरी हा पटकुऱ्या दिसायचाच...अगदी एखादी रात्र सुनी जायची- तो नियम सिद्ध होण्यासाठीचा एखादा अपवाद! त्यानंतर मी त्या प्राण्यांच्या ढोबळ दिसण्यावरून गुगलवर सर्च करून त्यांचे इंग्रजी नाव आणि शास्त्रीय नाव शोधून काढले. इंग्रजीतले त्यांचे ‛सिव्हेट’ हे नाव मला खूपच भावले. त्यांचे मराठीतील नाव म्हणजे ‛उदमांजर’!
२०१४ नंतरच्या चार वर्षांत मी पालघर जिल्ह्यात कार्यरत होतो. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत येत असला तरी त्यावेळी फारसे काही प्राणीदर्शन झाले नाही. (तेव्हा गडकिल्ले खूप फिरलो.) आता परत मी कोल्हापूर जिल्ह्यात बदलीने आलो असता मागील काही काळ मी पन्हाळा येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहे. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी आल्यापासून पन्हाळगड अक्षरशः पालथा घातला आहे. गडावरील तबक उद्यान पक्षी आणि वनस्पतींच्या वैविध्यामुळे खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रसिद्ध बनले आहे. या उद्यानात पक्ष्यांच्या ८५ तर वृक्षांच्या सुमारे २२५ जातींची नोंद करण्यात आलेली आहे. याच उद्यानात उजव्या बाजूला सिमेंट-ब्लॉक्सचा एक ‛निरीक्षण मनोरा’ (viewing gallery) बनवलेला आहे- त्याला ‛सिव्हेट पॉइंट’ (उदमांजर निरीक्षण मनोरा) असे नाव दिले गेले आहे. याच्याच समोर एक-दोन ‛भेरली माडा’ची (Fishtail palm) झाडे आहेत. (पन्हाळ्यावरील तबक उद्यानात फिरताना किती जणांनी हा पॉइंट पाहिला आहे?)
पन्हाळगडावरील तबक उद्यानात गेल्यावर हे ठिकाण आपण आवर्जून पहा आणि आपल्या मुलांनाही दाखवा. यातून मुलांच्या मनात निसर्गप्रेम जागृत करता येऊ शकेल... |
योगायोग कसा असतो पहा. माझा आता संपूर्ण पन्हाळा पालथा घालून झाला आहे. काल पहाटे ‛आता आज मॉर्निंग वॉकला कुठे जावे?’ असा स्वतःशीच विचार करत मी अखेरीस तबक उद्यानात गेलो. तिथल्या सिव्हेट पॉइंटवर गेलो. समोरचे माडाचे झाड पाहिले. थोडावेळ छान शांततेत घालवला. नंतर परतताना ‘वाघ दरवाजाच्या’ छतावर जाऊन त्याची रचना अभ्यासली आणि मग दुतोंडी बुरुजामार्गे पुसाटी बुरुजाकडे आगेकूच केली. संपूर्ण रस्त्यावर मी एकटाच होतो. (गडावर, जंगलात, घाटात एकट्यानेच भटकंती करणे ही माझी पॅशन!) अशावेळी मी एकटा असतो, एकाकी नाही!! आज साथीला वानरांची टोळी होती. त्यांनी खाऊन टाकलेल्या कच्च्या आंब्यांचे सडे प्रत्येक आंब्याच्या झाडाखाली पडले होते. पन्हाळगडाच्या मसाई पठाराकडील या बाजूची दगडी तटबंदी आजही भक्कमपणे उभी आहे. या तटबंदीच्या बाजूने चालत असताना भेरली माडाची बरीच झाडे दिसतात आणि अशी झाडे असलेल्या जागेच्या आसपास उदमांजरांचे अस्तित्व दर्शविणाऱ्या खुणा असतात, त्याही मला दिसल्या. मी तसाच पुढे चालत गेलो आणि मग जी गोष्ट पाहणे निसर्गवेड्या माणसाला कधी आवडणार नाही अशी एक गोष्ट मला राजदिंडी मार्गाच्या शेजारी असणाऱ्या अवकाश संशोधन केंद्राच्या बाजूच्या डांबरी रस्त्यावर दिसली.
जंगलात, गडकिल्ल्यांवर, घाटात आणि निसर्गाचे अस्तित्व असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी ‛एकट्यानेच’ फिरणे मला खूप आवडते...तिथे मी बऱ्याचदा एकटा असतो; पण एकाकी कधीच नाही! |
पुसाटी बुरुजाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर चक्क एक उदमांजर मृतावस्थेत पडले होते. लांबून बघतानाच झुपकेदार काळ्या शेपटीवरून ते उदमांजराचे शरीर असावे याचा जो अंदाज मला आला होता, तो खरा ठरला. ते तपकिरी उदमांजर (Common palm civet) होते. अर्थातच जवळच तटबंदीला लागूनच शेजारी माडाचे झाड होते. पन्हाळगडावर अशा कोणत्यातरी प्राण्याचे अस्तित्व असल्याबाबत किती जणांना गांभीर्यपूर्वक माहिती आहे याबाबत मी साशंक आहे...असो.
या निमित्ताने का असेना, आपल्या इतक्या जवळ असणाऱ्या एका प्राण्याबद्दल आपण थोडीशी माहिती करून घेऊया.
उदमांजर-
आपल्या भागात प्रामुख्याने दोन प्रकारची उदमांजरे आढळतात-
पश्चिम घाटात आढळणाऱ्या उदमांजराच्या दोन प्रमुख प्रजाती (सौजन्य: वनविभाग, वन परिक्षेत्र, पन्हाळा) |
१. उदमांजर, इजाट (Small Indian Civet) (Viverricula indica)
हा सस्तन (Class Mammalia) आणि मांसाहारी (Order Carnivora) प्राणी असून वायविरीडी या कुळात (Family Viverridae) याचा समावेश केला जातो. याचे वर्गीकरण Genus Viverricula अंतर्गत करण्यात आले आहे.
या उदमांजराचा रंग राखाडी असून तपकिरी अंगावर काळ्या रंगाच्या ठिपक्यांच्या ओळी असतात, तर शेपटीवर काळ्या-पांढऱ्या रंगाचे गोलाकार पट्टे असतात. यांची लांबी ४५ ते ६० सेंमीच्या दरम्यान असून वजन २.५ ते ३.० किग्रॅ इतके असते. जंगलात आणि मानवी वस्तीच्या आसपासच्या भागांतही याचे वास्तव्य आढळते. ही निशाचर असतात.
इजाटचे अस्तित्व असणारा भूभाग |
२. तपकिरी उदमांजर (Common Palm Civet) (Paradoxurus hermaphroditus)
हाही सस्तन (Class Mammalia) आणि मांसाहारी (Order Carnivora) प्राणी असून याचे कूळ वायविरीडी (Family Viverridae) आहे. याचे वर्गीकरण Genus paradoxurus अंतर्गत केले गेलेले आहे.
निशाचर असणाऱ्या या काळपट तपकिरी रंगाच्या उदमांजराच्या अंगावर लहान काळ्या ठिपक्यांच्या रेषा असतात. यांची शेपटी काळपट रंगाची असून झुपकेदार असते. यांची लांबी ४२ ते ६९ सेंमीच्या दरम्यान असून वजन ३ ते ४ किग्रॅ असते. यांचे अस्तित्व हे जंगलात तर असतेच शिवाय मानवी वस्तीजवळही ही आढळतात.
तपकिरी उदमांजराचे अस्तित्व असणारा भूभाग |
उदमांजरे ही निशाचर असून एकाकी जगणारे प्राणी आहेत. यांच्या धारदार नखांमुळे ही सहजपणे झाडावर चढू शकतात (आणि त्यामुळेच काही वेळा गटारांच्या पायपांवर चढून ती मानवी निवासात पण घुसू शकतात). हे प्राणी जमिनीवर आणि झाडांवर अशा दोन्ही ठिकाणी वास्तव्य करतात, पण जास्त वेळा जमिनीवर आढळतात. वरील दोन्ही प्रकारची उदमांजरे मांसाहारी असून उंदरांसारखे लहान प्राणी, लहान पक्षी, कीटक, बेरी हे यांचे खाद्य असते. पण, यांच्या खाण्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भेरली माडाची फळे!
भेरली माड-
हा ताडकुळातील एक वृक्ष आहे. तो जास्त पावसाच्या भागात (कोंकण, महाबळेश्वर) नैसर्गिकरीत्या आढळत असला तरी उद्यानात व सुशोभीकरणासाठी देखील लावला जातो.
इतर ताडामाडाप्रमाणे भेरली माड हादेखील सदाहरित आणि निमसदाहरित जंगलात वाढणारा वृक्ष आहे. याच्या लोंबकळणाऱ्या फुलोऱ्याच्या माळांमुळे याला शिजवटा हे नाव पडले आहे. हा फुलोरा फुले असताना व फळे असतानाही खूप सुरेख दिसतो. ताड-कुळातील हा एकच वृक्ष असा आहे की जो समुद्रसपाटीपासून सह्याद्रीच्या उंच भागात सर्वत्र सापडतो.या वृक्षाचे जन्मस्थानच सह्याद्री आहे. भेरली माडाचे वृक्ष हे ३०-४० फूट उंच असते. त्याचे खोड एकेरी गोलाकार सरळसोट वाढणारे आणि बाहेरील बाजूला थोडे खडबडीत असते. याच्या संपूर्ण वाढलेल्या बुंध्याचा घेर ५-६ फूट एवढा असतो. पर्णिकांचा आकार माशांच्या शेपटीच्या टोकासारखा असल्यामुळे याला इंग्रजीत ‘फिश टेल पाम’ असे नाव पडले आहे.
भेरली माड (Fishtail Palm); स्थळ: पुसाटी बुरूज, पन्हाळा; छायाचित्र: © डॉ. अमित |
याच्या फुलोऱ्यात नर व मादी अशी दोन्ही फुले असतात. परिपक्व झालेले फळ गोलाकार असून त्याला मांसल आवरण असते. त्याच्या आत दोन अर्धवर्तुळाच्या आकाराच्या दोन बिया असतात. या बियांना अर्धी सुपारी म्हणतात.असे म्हणतात की अर्ध्या सुपाऱ्या उगळून त्याचा लेप डोक्याला लावल्यास अर्धशिशीचा त्रास कमी होते. भेरली माडाची फळे उदमांजरे फार आवडीने खातात. त्यामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट नावाचे रासायनिक द्रव्य मोठ्या प्रमाणात असते. या झाडाचे कॅरिओटायुरेन्स हे नाव याच गुणधर्मावर आधारित आहे.कारण युरेन्स या शब्दाचा अर्थ 'खजरा' असा होतो.
सौजन्य: वनविभाग, वन परिक्षेत्र, पन्हाळा |
पन्हाळगडावर भेरली माडाची अनेक झाडे होती, मात्र वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. मात्र, गडावर असणारे तबक उद्यान हे वनखात्याच्या अखत्यारीत असल्यामुळे येथे हे वृक्ष काही प्रमाणात का असेना पण अजूनही टिकून आहेत. या झाडांच्या आसपास उदमांजरांचे अस्तित्व दर्शविणाऱ्या त्यांच्या विष्ठेतील बिया मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
उदमांजराच्या विष्ठेतील भेरली माडाच्या फळांच्या बिया त्याचे अस्तित्व दर्शवितात! |
भेरली माड आणि उदमांजर: परस्पर सहअस्तित्व |
आंतरराष्ट्रीय निसर्गसंवर्धन संस्थेने (IUCN) (International Union for Conservation of Nature) बनविलेल्या लाल यादीत (Red list) उदमांजराचा समावेश ‛अस्तित्वाला एकदम कमी धोका (least concern)’ प्राण्यांमध्ये करण्यात आला असला तरी भारताच्या ईशान्य भागातील काही राज्यांत, चीन-म्यानमार आदी देशांत होणाऱ्या शिकारी आणि काही देशांत उदमांजरांना पाळण्याची आलेली फॅशन यामुळे त्यांची संख्या हल्ली झपाट्याने खालावत आहे. आपल्या इतक्या जवळ राहणाऱ्या या प्राण्यांचे संवर्धन करणे आणि त्यांच्या अस्तित्वाला धोका न पोहचू देणे आता आपल्याच हातात आहे!
जाता जाता महत्त्वाचे-
कॉपी (कॉफी) लुवाक-
कॉपी लुवाक ही अशा पद्धतीचा पारंपारिक कॉफीचा प्रकार आहे ज्यात उदमांजराच्या विष्ठेतील कॉफीच्या बियांपासून कॉफी तयार केली जाते. हा कॉफीचा प्रकार काही देशांत अत्यंत प्रसिद्ध आहे. पण, यामुळेच एक मोठा धोका या प्राण्याच्या अस्तित्वावर घोंघावत आहे. कारण, मोठ्या प्रमाणात ही कॉफी तयार करण्यासाठी जंगलातील उदमांजरे पकडून त्यांना जबरदस्तीने कॉफीच्या बिया चारल्या जातात. यासाठी पकडण्यात येणारी उदमांजरे दयनीय अवस्थेत पिंजऱ्यात कोंडून ठेवली जातात. इंडोनेशिया या देशात या प्रकारामुळे उदमांजरांची संख्या झपाट्याने खालावत आहे.
संदर्भ-
(१) वीकिपीडिया
(२) वनविभागाने प्रसृत केलेली माहिती
© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील
Far best mahiti milali. Tyachi vista same Aahe. Aaplya Ashokachya budala padleli Aahe. Best PranI.
ReplyDeleteThank you.
Deleteछान अभ्यासपूर्ण लेख.. सर्व लेख वाचायला आवडतील..
ReplyDeleteThank you very much.
Delete