व्यवस्थित न पाहिलेला पन्हाळा: हनुमान शिल्प आणि वैशिष्ट्यपूर्ण ‛महादेव आप्पाचा डबरा (कुंड)’/ Unseen Fort Panhala: Lord Hanuman Sculpture and Mahadeo Appa's Vessel (small well)

व्यवस्थित न पाहिलेला पन्हाळा: हनुमान शिल्प आणि वैशिष्ट्यपूर्ण ‛महादेव आप्पाचा डबरा (कुंड)’
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
(www.trekdoctoramit.blogspot.com)

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड हा पौराणिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा किल्ला आहे.

पन्हाळा हा किल्ला बनण्याअगोदर ब्रह्मगिरी ¹ या नावाने ओळखला जात असे. पराशर ऋषींनी येथे आश्रम स्थापल्यामुळे या परिसराला पराशराश्रम ² असेही म्हणत. पुढे नागवंशीय लोक पराशरांना शरण आल्यामुळे त्यांनी येथे वास्तव्य केले, ज्यामुळे पन्हाळ्याला पन्नगालय ³ असेही म्हटले जाऊ लागले.

इ. स. ११९० मध्ये शिलाहार राजांनी त्यांच्या राज्याची राजधानी पन्हाळ्याला आणली. (सन ११८७ मध्ये शिलाहार राजवटीची राजधानी वाळवा येथे, नंतर कोल्हापूर येथे आणि शेवटी पन्हाळ्याला होती.)

अफजलखान वधानंतर १८ व्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर, १६५९ रोजी शिवरायांनी पन्हाळा जिंकला. २० सप्टेंबर, १६६० रोजी महाराजांनी आदिलशहाशी केलेल्या तहात या गडाचा ताबा आदिलशहा सल्तनतीकडे गेला. १६६६ मध्ये औरंगजेबाच्या बाजूने लढताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला सुलतानढवा अयशस्वी होऊन महाराजांचा पराभव झाला होता. महाराजांनी लढलेल्या लढायांपैकी ९८% लढाया जिंकल्या; ज्या थोड्या लढायांत त्यांचा पराभव झाला त्यापैकी ही एक. पुढे १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद यांनी केवळ ६० मावळ्यांच्या बळावर पन्हाळगड जिंकण्याचे दिव्य केले. इ. स. १७०१ मध्ये औरंगजेबाने स्वतः हा गड जिंकला तेव्हा त्याने गडाला बेनीशहादुर्ग ⁴ असे नाव दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमारे ५०० दिवस या गडावर वास्तव्य होते. छत्रपती संभाजी महाराजांनी तर पन्हाळ्यातच राजधानी वसवली होती. इ. स. १६७९ च्या डिसेंबर महिन्यांत शिवशंभूची भेट अंबारखान्याजवळील महादेव मंदिरात झाली होती. यामुळे पन्हाळगड हा पवित्र बनला आहे.



गडावर अनेक वास्तू आहेत...तीन दरवाजा ही त्यातील महत्त्वाची वास्तू. अतिभव्य आणि अतिसुंदर अशी ही रचना. येथूनच सरळ कोकण दरवाज्यातून दरीच्या दिशेने खाली गेल्यावर एक हनुमानशिल्प आणि त्याजवळ एक ‘महादेव आप्पाचा डबरा’ या नावाचे कुंड असल्याची माहिती मी मिळवली होती.




दुर्दैवाने स्थानिक लोकांनाही याबद्दल काहीच माहिती नाही. आज सकाळी (१९/०४/२०१८) मी या रचना शोधण्यासाठी गेलो तेव्हा बराच वेळ मला काहीही दिसले नाही. त्यानंतर थोडासा निराश होऊन परतत असताना मी सहज म्हणून कातळाखालील जंगलातल्या एका टेकाडावर जाऊन पाहिले असता मला हनुमानशिल्प दिसले. तेथे अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तेथे पूजा करणाऱ्या एका व्यक्तीला मी मंदिर आणि कुंडाबद्दल माहिती विचारली असता, त्यांनी आश्र्चर्य व्यक्त केले. “या गोष्टी तुम्हाला कशा काय कळाल्या?” असा त्यांचा थेट सवाल. त्यावर “मला गडकिल्ले फिरून अभ्यास करायला आवडते” असे मी त्यांना सांगितले. त्यावर मला त्यांनी नमस्कारच काय तो करायचा बाकी होता. पन्हाळ्याभोवती  अकरा हनुमान असल्याची नोंद असल्याचे त्यांनी मला सांगितले. मी मनोभावे त्या हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर मग त्यांना मी ‘महादेव आप्पाच्या डबऱ्या’कडे जाणार मार्ग विचारला. त्यावर, बरेच दिवस कोणी तिकडे फिरकले नसल्याचे त्यांनी सांगितले. नंतर त्यांनी मला अंदाजे मार्ग सांगितला.



मी संशोधक वृत्तीने ते कुंड शोधू लागलो. बराच वेळ आणि तीन-चार वेळा तो परिसर पालथा घालूनही मला काही तो कुंड सापडेना. अखेरीस मी परत त्या स्थानिक व्यक्तीला विचारणा करायला गेलो. माझी प्रबळ इच्छाशक्ती म्हणा किंवा नशीब बलवत्तर म्हणा; ते अजूनही तिथेच होते. मी त्यांना कुंड दाखवायची विनंती केली असता ते त्यांचे काम आटोपून उत्साहाने माझ्यासोबत यायला निघाले. परत एकदा आधीच्याच रस्त्यावरून आम्ही मार्गस्थ झालो. मी तर खूपच साशंक आणि अस्वस्थ झालो होतो. अखेरीस एका कातळाकडे लांबूनच अंदाजे हात दाखवून “हाच तो कुंड” असे ते म्हणाले.



तिकडे जायला निघालो असता घनदाट झाडींनी आणि काटेरी वनस्पतींनी तो मार्ग भरून गेल्याचे लक्षात आले. बरेच काटे टोचूनही कुंड पाहण्याचा माझा उत्साह काही कमी झाला नव्हता. अखेरीस तेथील कातळाला ओलसरपणा असल्याचे दिसल्यानंतर माझे रक्त सळसळू लागले. दिसेल ते झाड ओलांडत, काटे तुडवत अखेरीस आम्ही तिथे पोहोचलो. तिथे उपसा नसल्यामुळे घाण झालेल्या पाण्याने भरलेला आणि एखादी कळशीच कशीबशी आत जाईल इतक्या आकाराचा कुंड दिसला. हाच तो ‘महादेव आप्पाचा डबरा’!



त्या कुंडाच्याच वर काही अंतरावर जवळपास १०० फुटी उंच कातळाच्या पायाशी दोन अतिसुंदर शिल्पचित्रे कोरलेली दिसतात; पण एका उंबराच्या झाडामुळे आणि बरेच दिवस तिकडे कुणीही फिरकले नसल्यामुळे ती शिल्पचित्रे झाकोळून गेली होती.



त्या झाडाचा अडथळा थोडासा बाजूला केला असता डाव्या कातळावर शिवलिंग तर उजव्या कातळावर नंदीचे शिल्पचित्र स्पष्टपणे दिसून येते.



खरेतर हे शिल्प नसून कातळात अतिशय सुबकरीतीने कोरलेले ते शंभू महादेव मंदिराचे शिल्पचित्र असल्याचे लक्षात येते. या कोरीव पिंडीवरदेखील पाणी पडण्यासाठी छताला बांधलेल्या तांब्याच्या पात्राचे शिल्पचित्र कोरले आहे. तसेच मंदिराच्या भिंतीचे आणि छत्राचे रेखाचित्र कोरलेले आढळते.



याच कातळासमोरील उजवीकडील वेगळ्या कातळावर नंदीचे शिल्पचित्र बनवले गेले आहे. या नंदीची शेपूट उडती दाखवली असल्याने चित्रात एक वेगळाच जिवंतपणा आल्याचे लगेच जाणवते. याच शिल्पचित्रात नंदीसमोर आणखीन एक छोटी पिंड कोरलेली आढळते. या शिल्पालाही भिंती आणि छत यांचे रेखीव काम केले गेल्याचे लक्षात येते.



इतक्या उन्हाळ्यातही येथे पाण्याची संततधार चालूच असल्याचे दिसते.

हनुमानशिल्प आणि हे कुंड शोधण्यात योगायोगाने भेटलेले स्थानिक नागरिक श्री. प्रकाश सुतार यांची मदत झाली. त्यांनाही माझ्या शोधक वृत्तीचे भारीच कौतुक वाटले असल्याचे त्यांनीच मला सांगितले.



एखाद्या ध्येयामुळे लागलेल्या ध्यासाची पूर्ती होण्याच्या आनंदाचा क्षण अमूल्यच... केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आशीर्वादानेच हे शक्य होऊ शकले!!!



संदर्भ:
(१) दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे: लेखक भगवान चिले
(२) एक स्थानिक नागरिक

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
ग्रामीण रुग्णालय, पन्हाळा/ उपजिल्हा रुग्णालय, गांधीनगर,
कोल्हापूर)

Comments

Popular posts from this blog

“उदमांजर, भेरली माड आणि माझी भटकंती!” (Palm civet, Fishtail palm and my wanderings!)

रानफुले (भाग ३; कलानिधीगड, पारगड आणि गंधर्वगड ट्रेक) The Wild Flowers (Part III, Kalanidhigad, Pargad and Gandharvgad Trek) (Flowers found in Sahyadris)

रानफुले (भाग १; पावनगड ट्रेक); The Wild Flowers (Part I, Pavangad Trek) (Flowers found in Sahyadris)