व्यवस्थित न पाहिलेला पन्हाळा: हनुमान शिल्प आणि वैशिष्ट्यपूर्ण ‛महादेव आप्पाचा डबरा (कुंड)’/ Unseen Fort Panhala: Lord Hanuman Sculpture and Mahadeo Appa's Vessel (small well)
व्यवस्थित न पाहिलेला पन्हाळा: हनुमान शिल्प आणि वैशिष्ट्यपूर्ण ‛महादेव आप्पाचा डबरा (कुंड)’ (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील) (www.trekdoctoramit.blogspot.com) कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड हा पौराणिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळा हा किल्ला बनण्याअगोदर ब्रह्मगिरी ¹ या नावाने ओळखला जात असे. पराशर ऋषींनी येथे आश्रम स्थापल्यामुळे या परिसराला पराशराश्रम ² असेही म्हणत. पुढे नागवंशीय लोक पराशरांना शरण आल्यामुळे त्यांनी येथे वास्तव्य केले, ज्यामुळे पन्हाळ्याला पन्नगालय ³ असेही म्हटले जाऊ लागले. इ. स. ११९० मध्ये शिलाहार राजांनी त्यांच्या राज्याची राजधानी पन्हाळ्याला आणली. (सन ११८७ मध्ये शिलाहार राजवटीची राजधानी वाळवा येथे, नंतर कोल्हापूर येथे आणि शेवटी पन्हाळ्याला होती.) अफजलखान वधानंतर १८ व्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर, १६५९ रोजी शिवरायांनी पन्हाळा जिंकला. २० सप्टेंबर, १६६० रोजी महाराजांनी आदिलशहाशी केलेल्या तहात या गडाचा ताबा आदिलशहा सल्तनतीकडे गेला. १६६६ मध्ये औरंगजेबाच्या बाजूने लढताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला सुलतानढवा अयशस्वी होऊन महाराजांचा परा...